top of page
  • Writer's pictureYuvonmesh JP

शोध विचारसरणींचा

महाराष्ट्रात निवडणुका घोषित झाल्या तेव्हा एका मित्राशी चर्चा करत होतो. निवडणुकांमधे नक्की काय होईल किंवा कोण जिंकेल अशा प्रकारचं बोलणं चालू होतं. तेव्हा चर्चेचा विषय हा राजकीय पक्ष आणि त्यांच्या विचारसरणी यांच्यावर आला. माझा मित्र म्हणाला, "विचारसरणीला चिकटून तुम्ही काहीही साध्य करू शकत नाही. राजकीय पक्ष तर मुळीच नाही. राजकारणात व्यावहारिक असावं लागतं. त्यांचा उल्लेख केवळ भाषणांमधे आणि लेखांपुरताच बरा." तो हे बोलता क्षणी माझ्यातला राज्यशास्त्राचा विद्यार्थी दुखावला गेला. त्यानंतर मी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला की तू बोलतो आहेस ते पूर्णपणे खरं नाही. महाराष्ट्रातच काय, जगभरात सुद्धा विचारसरणींचं अजूनही प्रचंड महत्त्व आहे, पण त्याला काही ते पटलं नाही. किंबहुना मला देखील ते त्याला नीट समजावता आलं नाही.

पण मग विचारसरणी म्हणजे नक्की काय?

आजच्या काळात, सोप्या शब्दात जर परिभाषा करायची झाली तर असे म्हणता येईल की विचारसरणी म्हणजे 'सुसंगत, पद्धतशीर आणि शास्त्रीय प्रकारे मांडल्या गेलेल्या विचारांची प्रणाली - जी सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक व्यवहाराचा सैद्धांतिक पाया आहे. सद्यस्थितीत वापरल्या जाणाऱ्या अर्थानुसार विचारसरणीची काही वैशिष्ट्ये आहेत. राजकीय तज्ज्ञ अँड्र्यू हेवूड (Andrew Heywood) असं म्हणतो की सर्व राजकीय विचार हे सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भांनी प्रभावित आहेत आणि ते माणसांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा सिद्धीस नेण्यात मदत करतात यात वाद नाही. तसंच विचारसरणी माणसाच्या भौतिक जीवनाला प्रभावित करतात आणि याचाच एक परिणाम म्हणून विचारसरणी समाजाला एकत्र आणण्याचं किंवा एखादी सामूहिक ओळख देण्याचं काम करतात. मात्र आजच्या या अर्थाकडे पोचेपर्यंत विचारसरणी या संकल्पनेने खूप मोठा प्रवास केला आहे, ज्यात अनेकांनी त्यावर महत्त्वाची भाष्यं आणि टीका केली आहे.

Antoine Tracy

विचारसरणी (ideology) या शब्दाचा उगम कसा झाला हे पुरेसं स्पष्ट आहे. सर्वप्रथम त्या शब्दाचा प्रयोग फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान आनतुवान् ट्रेसी (Antoine Tracy) या विचारवंताने केला. अगदी अक्षरशः बघायला गेलं तर ट्रेसीसाठी या शब्दाचा अर्थ 'विचारांचे शास्त्र' (idea-ology) असा होता. तो म्हणतो की आपण वस्तुनिष्ठपणे कोणत्याही विचारांचा उगम कसा झाला हे शोधू शकतो. त्यामुळे ठरावीक विचार कसे अस्तित्वात आले किंवा त्यांचं शास्त्र या स्वरूपात कसं रूपांतर झालं हे 'विचारांच्या शास्त्रातून' शोधणं शक्य आहे. वर्तमान काळात जरी आपण विचारसरणी या शब्दाचा गर्भितार्थ ट्रेसीने सुचवल्याप्रमाणे घेत नसलो तरी त्याने सांगितलेल्या संकल्पनेतून काही महत्त्वाचे मुद्दे पुढे येतात. एक म्हणजे मनुष्याच्या डोक्यात सहजगत्या आलेले कोणतेही असंबद्ध विचार म्हणजे विचारसरणी नव्हे. त्या विचारांमध्ये काही प्रमाणात का असेना पण सुसंगती हवी. दुसरं म्हणजे विचारसरणी आपल्याला मनुष्याचा स्वभाव आणि त्याच्या संवेदनांमधून सभोवताली चाललेल्या सामाजिक व राजकीय घटना समजून घेण्यास मदत करते. ट्रेसीची संकल्पना असं सांगते की एखाद्या विचारसरणीमधील विचार हे केवळ सुसंगत असून चालणार नाहीत, तर ते पद्धतशीर आणि शास्त्रीय विश्लेषणातून पुढे आले असले पाहिजेत. त्यातून आपल्याला हे देखील कळलं पाहिजे की त्या व्यक्तीने मांडलेल्या विचारांमागची नेमकी कारणं कोणती किंवा त्या विचारांचे आधारस्तंभ कोणते. याचा अर्थ, मांडलेले विचार 'काय आणि कशासाठी' आहेत हे ज्यातून समजतं ती म्हणजे विचारसरणी.

Karl Marx

विचारसरणी या शब्दावर सर्वात मोठी टीका ही मार्क्सने (Marx) केली. मार्क्स म्हणतो की विचारसरणी ही त्या वेळच्या राज्यकर्त्या वर्गाशी जुळलेली असते. याचा अर्थ असा की ज्या वर्गाचं समाजातील बहुतांश भौतिक संसाधनांवर नियंत्रण असतं, फक्त तोच वर्ग त्यावेळी योग्य आणि आदर्श मानले जाणारे विचार कोणते हे ठरवतो. बाकी वर्गातील लोकांचे विचार हे त्या मुख्य विचारांचा खाली दाबले जातात. पुढे मार्क्स असं म्हणतो की यामुळेच विचारसरणी ही केवळ समाजातील (आर्थिक) वर्ग रचनेशी जोडली गेलेली आहे - तिला स्वतःचे असे अस्तित्व नाही. आणि सर्वात शेवटी तो सांगतो, की विचारसरणी समाजात फक्त संभ्रम आणि गैरसमजुती पसरवते. परिणामी, मार्क्सच्या साथीदार एन्गेल्स (Engels) याने नंतर विचारसरणीला खोटी / पोकळ जाणीव (false consciousness) असं म्हटलं आहे. राज्यकर्ता वर्ग या अशा विचारसरणीचा वापर त्यांनी चालू ठेवलेले जुलूम आणि अत्याचार, शोषित वर्गापासून लपवण्यासाठी करतो असा युक्तिवाद त्या दोघांनी केला. अशाप्रकारे विचारसरणी या शब्दाला मार्क्सवादी टिकाकारांमुळे काहीसा नकारात्मक अर्थ प्राप्त झाला. आधुनिक युगातील औद्योगिक समाजरचनेमधील व्यापारी (bourgeoisie) किंवा भांडवलदार वर्गाकडून इतर वर्गांचं केलं जाणारं शोषण संपुष्टात आणण्यासाठी मार्क्सवाद्यांनी विचारसरणी या संकल्पनेला एक नवीन अंग जोडलं. पण या विश्लेषणात एक मोठी त्रुटी आढळते. मार्क्सने 'उदारमतवाद (liberalism)' आणि 'पुराणमतवाद (conservatism)' या दोनच केवळ विचारसरणी आहेत, असं घोषित केलं, आणि त्याचे स्वतःचे विचार हे मात्र विचारसरणी नसून फक्त एक शास्त्रीय मांडणी आहे असं सांगितलं. अशाने विचारसरणी अत्यंत प्रतिबंधात्मक संकल्पना बनते, जी प्रत्यक्षात तशी नाही. मार्क्सचे विचार सुद्धा एक विचारसरणीच आहे. कोणताही गट असं म्हणू शकत नाही की त्यांचे विचार सत्याची बाजू मांडतात त्यामुळे ती केवळ शास्त्रीय मांडणी आहे आणि दुसऱ्या गटाचे विचार समाजाला फसवण्याचं काम करतात म्हणून ती विचारसरणी आहे. काहीजण त्यांचे विचार पद्धतशीरपणे, पुराव्यांनिशी मांडू शकतात याचा अर्थ त्यांचे विचार संपूर्णपणे शास्त्रीय आणि व्यक्तिनिरपेक्ष असतील असं नाही. त्याच वेळी विचारसरणी अत्यंत तटस्थ किंवा निष्पक्षपाती देखील असू शकत नाही. कारण मुळातच विचारसरणी, त्या त्या समाजाचे किंवा गटाचे विचार, त्यांच्या दृष्टिकोनातून समोर आणते.


विचारसरणींचं निराळेपण हे वेगवेगळ्या समाजगटांवर झालेल्या परिणामांमधून दिसून येतं. पण विचारसरणी समाजात ज्या भूमिका बजावतात त्यात पुरेसं साम्य आहे. तसं बघायला गेलं तर, आपण अशा छोट्या-मोठ्या भूमिकांची भलीमोठी यादी तयार करू शकतो. पण काहीच भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. त्यातील सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे विचारसरणी समाजाला घडवते. एखाद्या विचारसरणीमुळे समाज एका धाग्यात विणला जातो. त्यांच्या आशा, श्रद्धा, निष्ठा त्यातून व्यक्त होतात. त्या समाजातील लोक कधीतरी सजगपणे, किंवा कधीतरी नकळतपणे वेगवेगळ्या कृतींमधून किंवा संभाषणातून त्यांचे विचार व्यक्त करत असतात. त्या विचारांना साचा देते ती म्हणजे विचारसरणी. उदा. अमेरिकेच्या राष्ट्रघडणीमधे व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, कमीत कमी नियमन असलेली अर्थव्यवस्था अशा विचारांचा खूप मोठा वाट आहे. त्यामुळे आज सुद्धा अमेरिकेच्या विविध क्षेत्रातील निर्णयांमागे तसा प्रभाव दिसून येतो. यातून विचारसरणीची दुसरी भूमिका स्पष्ट होते. ती म्हणजे, एखादी विचारसरणी सद्यस्थितीतील समाजरचना आणि चालू घडामोडी यांचं विश्लेषण करण्यास उपयोगी ठरते. उदा. उदारमतवाद आणि भांडवलशाही वर आधारित समाजरचनेतील त्रुटी आणि त्यातून समाजाचे होणारे शोषण हे समोर आणण्यास मार्क्सवाद आणि समाजवादाने खूप मोठी भूमिका निभावली. तिसरी आणि त्यातल्या त्यात ठळक अशी भूमिका, म्हणजे विचारसरणी ही समाजात राजकीय किंवा सामाजिक बदल घडवून आणण्याचे साधन म्हणून वापरता येते. कोणतीही विचारसरणी सैद्धांतिक पातळीवर पुरेशी सुसंगत नसली, तरीदेखील परिणामक्षम पातळीवर ती निर्णायक ठरते. कोणताही मोठा राजकीय बदल घडवण्याची ताकद विचारसरणीमध्ये आहे. उदा. विसाव्या शतकात भारत आणि त्यासारख्या अनेक देशांमधील स्वातंत्र्यलढ्यांमागे राष्ट्रवाद (nationalism) ही विचारसरणी खूप प्रभावशाली होती. बदल घडवणाऱ्या राजकीय चळवळींसाठी लोकांना एकत्र जमवण्याचं काम आणि त्यांच्या संधारणाचं काम हे विचारसरणीमुळेच शक्य होतं.

पण मग आज त्यांची समपर्कता काय?

गेल्या शतकातील काही महत्त्वाच्या घडामोडींमुळे अस्तित्वात असलेल्या विचारसरणींना नवं स्वरूप लाभलं आणि काही वेगळ्या विचारांवर आधारित विचारसरणी या उभरतीस आल्या. बदलत्या जगाशी जुळवून घेण्यासाठी आणि त्या विचारसरणीतील दोष दूर करण्यासाठी काही अभ्यासकांनी समाजात रूढ असलेल्या विचारसरणींमधे बदल केले. यातून नव-उदारमतवाद (neo liberalism), नव-मार्क्सवाद (neo marxism) यासारख्या विचारसरणी पुढे आल्या. तसेच जागतिकीकरण, तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिक तापमानवाढ, सोवियत युनियनचा अस्त, भू-राजनैतिक (geopolitical) वाद अशा काही घटनांमुळे पर्यावरणवाद (environmentalism), उपभोक्तावाद (consumerism), धार्मिक कट्टरतावाद (religious fundamentalism) यासारख्या विचारसरणींचा उगम झाला किंवा त्यांचं अस्तित्व प्रकर्षानं जाणवू लागलं.


विविध विचारसरणींबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्यासाठी ही Video Playlist बघा :

https://www.youtube.com/playlist?list=PLS0CO0PT_kELhtLZKz7X8XvWpBRYV4Hza

हेवूड (Heywood) असं म्हणतो की यामागचं मुख्य कारण तंत्रज्ञानाच्या आणि समृद्धीच्या वाढत्या पातळीमुळे लोकांच्या विचारांमधे होणारे बदल हे आहे. भौतिक सुखसोयी पूर्ण झाल्यानंतर माणूस आपसूक त्याच्या जीवनाच्या गुणवत्तेबद्दल विचार करायला लागतो. सांस्कृतिक ओळख जपणे, जागतिक शांतता, मानवी हक्क आणि त्यासोबत प्राण्यांचे हक्क, नैतिकता असे विषय हे प्रामुख्याने चर्चेत येऊ लागतात. त्यामुळे वर दिलेल्या विचारसरणी आणि त्यावर आधारित अनेक सामाजिक चळवळी आज आपल्याला उभ्या राहिलेल्या दिसतात. यासोबत जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सामाजिक बंध (social bonds) यात सुद्धा बदल झाले आहेत. याचा परिणाम म्हणून लोक केवळ आपल्या देशातील किंवा संस्कृतीतीलच नाही, तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्यास एकत्र येऊ शकले. ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) या युवतीने सुरू केलेली Fridays for Future ही चळवळ याचं उत्तम उदाहरण आहे. आत्ताच्या प्रौढ पिढीने जागतिक तापमानवाढ थांबवण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि ही त्यांची जबाबदारी आहे याची जाणीव त्यांना व्हावी, असं या चळवळीचं उद्दिष्ट आहे. यासाठी ग्रेटाने अनेक देशांमधील शालेय वयोगटातील मुलामुलींना आंदोलन करण्यास प्रेरित केलं. एकमेकांशी कोणतीही ओळख नसताना सुद्धा असे वयोगट एकत्र येऊ शकतात हे यातून सिद्ध झालं. अशी नवी आंदोलनं आणि चळवळी विचारसरणीच्या बदलत्या स्वरूपाचं दर्शक आहेत.

Greta Thunberg

पुढील काही लेखांमध्ये आपण राज्यशास्त्रातील काही मुख्य विचारसरणी - उदारमतवाद, भांडवलशाही, समाजवाद, मार्क्सवाद, साम्यवाद (communism), आणि स्त्रीवाद (feminism) - समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या विचारसरणींचा गाभा, त्यांचा विकास आणि प्रवास कसा झाला, समाजावर त्याचे काय परिणाम झाले, तज्ज्ञांनी व अभ्यासकांनी त्यावर केलेली टीका आणि आजच्या काळात त्यांची समपर्कता या काही मुद्द्यांच्या आधारे आपण त्या जाणून घेणार आहोत. त्यांचं एकमेकांमधलं नातं हे अत्यंत जटिल जरी असलं, तरी ते उलगडायचा प्रयत्न करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जुन्या विचारसरणी या अत्यंत साचेबद्ध आणि स्पष्ट असल्या तरी आता तसं उरलेलं नाही. त्यामुळे नवीन विचारसरणी कशा घडतात किंवा घडल्या, याचा मागोवा घेणं महत्त्वाचं आहे. समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील किंवा ते नीट समजून घ्यायचे असतील, तर लोकांच्या अडचणींचा, निष्ठांचा आणि नैतिकतेचा पाया काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी तो पाया म्हणजे एखादी विचारसरणी असली तरी त्याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. त्यासाठी स्वतःला एक प्रश्न विचारून बघूया – आपण खरंच विचारसरणींमधे गुंतलो आहोत का? की आपल्याला त्याचा सुगावा देखील लागलेला नाही?


- रोहित केंजळे

273 views1 comment

Recent Posts

See All
bottom of page