साधारणतः भारतात आत्महत्या हा शब्द आला की दोनच गोष्टी समोर येतात. एक म्हणजे विद्यार्थी आणि दुसरा शेतकरी... ह्यातला विद्यार्थी हा गट बराच चर्चिला जातो कारण बहुतांशी तो शहरी असतो. पण शेतकरी आत्महत्या हा विषय फक्त निवडणुका आल्या की थोडा काळ चघळला जातो आणि मग पुन्हा एकदा जुन्या पेपराबरोबर रद्दीत जाऊन बसतो. आपण सर्वांनीच शेतकरी आत्महत्या ह्या विषयावर बरीच् मते ऐकली असतात. मग त्यात रासायनिक खतांमुळे नापीक जमीन, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव ते पार अशिक्षितपणा आणि कर्जबाजारीपणा... सगळी करणे आपापल्या परीने उहापोह करतच असतात. परंतु ह्या सगळ्यांमधला कळीचा मुद्दा नेमका कोणता हे ठरवणे इतके सोपे काम नाही. भारतातील शेती ही भारताप्रमाणेच विविधतेनी नटलेली आहे. ह्या विविधतेला नेमका कसला शाप लागला आहे हे ओळखणे महा-कठीण काम वाटते. पण एका माणसाने ह्या समस्येमागचे नेमके कारण व समान सूत्र ओळखून त्यावर कामही केले आणि आवाजही उठवला. त्याला स्वतंत्र भारताच्या इतिहासातले पहिलेच भव्य ‘शेतकरी आंदोलन’ मानले जाते आणि त्याचे जनक म्हणजे शरद जोशी!
सुरूवात
शरद जोशी हे UPSC मधून Indian Postal Services मध्ये काम करत होते. त्यात ते universal Postal Union मध्ये भारतातर्फे Switzerland येथे नियुक्त होते. तिथल्या ऐशोआरामाच्या जीवनात पण त्यांना दिसली ती विकसित आणि अविकसित देशांच्या मधली प्रचंड दरी.. त्यात भारतात पिचणारा दीनवाणा शेतकरी! शेवटी एके दिवशी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी भारतात येऊन चाकण येथे मुद्दाम कोरडवाहू जमीन विकत घेतली. प्रचंड कष्ट करून ती कसायला सुरुवात केली. इथे त्यांना खऱ्या अडचणी कळायला सुरुवात झाली. एकतर कोणत्याही सुविधांचा अभाव... निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून राहणारा शेतकरी! त्याचबरोबर सरकारी परवानग्या मिळवण्यासाठी सतत मारावे लागणारे खेटे आणि प्रचंड भ्रष्टाचार. सरकारी यंत्रणेचा जाच आणि अकार्यक्षमता चीड आणणारी होती. पण तरीही त्यावर मात करून शरद जोशींनी शेतीला सुरुवात केली. पहिले काही प्रयत्न तसे निष्फळ गेले. पण मग एकदाचे कांद्याचे यशस्वी पीक आले. तो घेऊन ते बाजारात आले तेव्हा त्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमीच भाव मिळाला. त्यात कांदा हे नाशवंत पीक! फार काळ न विकता ठेवता येत नाही. त्याने उलट शेतकऱ्याचे नुकसानच होते आणि मग मिळेल त्या पडक्या भावाला तो कांदा विकावा लागतो. शरद जोशींनी हे अनुभव नीट हेरले. जर शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असेल तर तो कर्जबाजारीपणाच्या चक्रातून कधीच बाहेर येऊ शकणार नाही. डोक्यावर सतत कर्ज असेल तर शिक्षणाचा अभाव होईल. अशाने चुकीच्या समजुती व परंपरा ह्यातून ग्रामीण शेतकरी अजूनच मागे पडत जाईल. आर्थिक गरिबीतून साध्या साध्या रोगांमुळे कुपोषण वाढत जाते. त्यातून रोजगार क्षमता अजून खालावते आणि मग पुन्हा एकदा हे दुष्टचक्र फिरू लागते. ह्याचा नेमका उपाय म्हणजे किमान फायदा होईल असा भाव शेतकऱ्याला मिळवून देणे! यातूनच जन्म झाला पहिल्यावहिल्या शेतकरी आंदोलनाचा! २५ मार्च १९७८ साली चाकणच्या कांदे बाजारात शेतकऱ्यांनी शरद जोशींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केले. आंदोलन भव्य नसले तरी आजवर कधी कोणी आवाज उठवला नव्हता. व्यापाऱ्यांना व प्रशासनाला हा एक धक्काच होता. शेवटी त्यांच्या मागण्या मान्य होऊन कांदा खरेदी वाढीव भावाने सुरु झाली.
ऊस आंदोलन – मानाचा तुरा
दरम्यान शरद जोशींनी काळाची गरज ओळखून “शेतकरी संघटना’ ह्या नावाने एक संघटना स्थापन केली. त्याचा उद्देश हा शेतकऱ्यांची एकी घडवून आणणे व त्यातून नेमक्या समस्यांवर उपाय शोधून त्यासाठी आवाज उठविणे हा होता. ह्यात शरद जोशींना पुढचे पीक दिसले ते ऊसाचे! ऊस हे महाराष्ट्रासाठी फार महत्वाचे पीक होते. सगळा ऊस हा सहकारी साखर कारखान्यांकडे जात असे. तिथेच शेतकऱ्यांना ऊसाची किंमत दिली जाई. खरे तर शेतकरी हितासाठी तयार झालेले साखर कारखाने नंतर ह्याच शेतकऱ्यांच्या उरावर बसले. हे साखर कारखाने म्हणजे श्रीमंत, सत्तापिपासू राजकारण्यांचे अड्डे बनून गेले. त्यातून सामान्य गरीब शेतकरी पिसला जाऊ लागला. एका quintal चा उत्पादन खर्च २९० असताना प्रत्यक्षात भाव मात्र १४५ एवढाच मिळत असे! ही विसंगती भयानक होती. शरद जोशींनी ह्याविरुद्ध नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे आंदोलन छेडले. “भीक नको, हवे घामाचे दाम” असे म्हणत शेतकरी संघटनेने एका पाठोपाठ एक अशी आंदोलने सुरु केली. ऊसाचे आंदोलन महत्त्वाचे अशासाठी कारण त्याने शेतकरी संघटना एकदम राष्ट्रीय झोतात आली. ह्या आंदोलनाने शेतकऱ्यांच्या एकजुटीची खरीखुरी ताकद सरकार, प्रशासन आणि शहरी भागाला दाखवून दिली. आंदोलनात प्रथमच रस्ता रोको व रेल रोकोचे प्रयोग करण्यात आले. “कांद्याला मंदी, तर ऊसाला बंदी” ह्या घोषणेने जिल्ह्यातले सहकारी साखर कारखाने बंद ठेवण्यात आले. ह्या आंदोलनाला भव्य प्रतिसाद मिळाला. सरकारने प्रति quintal किमान रुपये ३०० चा भाव द्यावा अशी त्यांची न्याय्य मागणी होती. त्यात १० नोव्हेंबर १९८० रोजी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. त्यामध्ये दोन शेतकरी हुतात्मा झाले. आजही हा दिवस संघटनेमार्फत हुतात्मा दिन म्हणून सजरा होतो. या घटनेमुळे आंदोलन शमून जाण्याऐवजी अजूनच पेटले. मुंबई-आग्रा महामार्ग आणि नाशिक-मनमाड रेल्वे रोखून धरण्यात आली. तब्बल २ लाख शेतकरी ह्यात सामील झाले. ह्या आंदोलनादरम्यान अनेक ट्रक ड्रायव्हर चिडून आंदोलनकर्त्यांवर तलवारी घेऊन धावून गेले. त्यातले बरेचसे पंजाबी होते. त्यांना शांत करत जेव्हा आंदोलनकर्त्यांनी समजावून सांगितले तेव्हा तेही आंदोलनात आनंदाने सामील झाले. उलट पंजाबमधील शेतकऱ्यांची सुद्धा हीच स्थिती असून तुम्ही तिथे देखील आमच्या मदतील या असे त्यांनी आवाहन केले. शरद जोशींना ह्यातून हा प्रश्न देशव्यापी असल्याची जाणीव होत होती. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले ह्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आणि वाढीव भाव दिला गेला.
महत्त्व
उत्पादन खर्चावर भाव ठरवणे हा साधा गणिती हिशोब आहे. जर तो पाळला गेला नाही तर कोणताही धंदा बुडीतच जाणार हे निश्चित आहे. मग शेती हा देखील व्यवसाय टिकवायचा असेल तर त्याचं रुपांतर हे फायदेशीर धंद्यात झालं पाहिजे ही त्या मागची सोपी विचारधारा होती. संघटनेने पुढे तंबाखू, कापूस अशा अनेक आंदोलनांचा भडका उडवला. देशभरातले शेतकरी आशेने पल्लवित झाले. पुढे शेतकरी संघटना महाराष्ट्राबाहेरही जाऊन पोचली. सर्व आंदोलनात स्त्रियांचा सहभाग मोठा होता. एवढेच नव्हे तर जेव्हा प्रमुख नेते तुरुंगात गेले तेव्हा स्त्रियांनी न डगमगता आंदोलनाचे नेतृत्व खंबीरपणे केले. सरकारवर अशाने प्रचंड दबाव येत असे. त्याही काळात शरद जोशींच्या जातीचा उल्लेख करून अनेक नेत्यांनी आंदोलनात फूट पाडायचा प्रयत्न केला. पण हा प्रश्न जातीवर आधारित नसून आर्थिक आहे हे शेतकऱ्यांनी मनोमन हेरले होते. त्यामुळे एका अर्थी हे आंदोलन जातीविरहित होते. तिथे एकच जात होती - ती म्हणजे व्यवस्था पिडीत शेतकऱ्यांची!
विचारसरणी
आपण सतत जे अनेक नेत्यांच्या बोलण्यातून ऐकत असतो ती ‘भारत विरुद्ध इंडिया’ हे संकल्पना मुळात शरद जोशींची! शहरी भागाकडून म्हणजेच इंडियाकडून ग्रामीण भागाचे - भारताचे कसे शोषण होते हे त्यांनी सूत्रबद्ध रीतीने मांडून दाखवले. मुळात देशाची अर्थव्यवस्था ही समाजवादी विचारांवर आधारित होती. ज्यातून खरे तर एकता यायला हवी तिथे सरकारी एकाधिकारशाहीमुळे शोषण होत होते. शेतकऱ्यांची लूट केली जात होती. शरद जोशींचा ह्या समाजवादी विचारांनाच विरोध होता. ह्याचे सोपे उदाहरण म्हणजे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव ह्यांनी एकदा कबुली दिली की भारतात शेतकऱ्याला उणे ७२% सबसिडी दिली जाते. म्हणजे त्याचे उत्पन्न १०० रु असेल तर त्याच्याकडून कमी भाव देऊन फक्त ७२ रु मिळवलेले असतात. एकुणात शरद जोशींची विचारधारा ही उजवी होती. जेव्हा भारताची अर्थव्यवस्था खुली झाली तेव्हा त्याचे त्यांनी स्वागतच केले.
शरद जोशींना टीकाकार देखील भरपूर होते. त्यांना विरोध हा डाव्या विचारवंतांकडून होत असे. शरद जोशींची मागणी एकांगी असून फक्त शेतीमालाला वाढीव भाव दिल्याने प्रश्न सुटणार नाहीत असे काहींचे म्हणणे होते. उलट अशाने मालाची किंमत वाढत जाऊन ती परवडेनाशी होईल, कारण ग्राहकांच्या क्रयशक्तीवरही भाव आधारित असतो. ती जर वाढली नाही तर हे चक्र कोसळून पडेल, अशी टीका त्यांच्या धोरणांवर झाली. तसेच खुल्या अर्थव्यवस्थेचे स्वागत केल्याने त्यांचे अनेक जवळचे सहकारी मतभेद होऊन दूर झाले. शेतकरी संघटनेची ताकद काहीशी कमी झाली. अशातच त्यांनी राजकारणात उडी घेतली. ‘स्वतंत्र भारत पक्ष’ ह्या नावाने शेतकरी संघटनेचा अधिकृत पक्ष स्थापन झाला. पण इथेही मोठ्या प्रमाणात अपयश आले. जे मुद्दे आंदोलनात चालतात ते निवडणुकीत चालत नाहीत ह्याची प्रचिती आली.
शेतकरी संघटना आजही अस्तित्वात आहे आणि वेळोवेळी ती विविध प्रश्नांवर आवाजही उठवत असते. आज संघटनेची ताकद कमी झालेली असली तरी शरद जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान इतिहासाला नाकारता येणार नाही. प्रस्थापित अर्थतज्ज्ञांसारखे ते फक्त पुस्तके वाचून शिकले नव्हते तर त्यांनी स्वतः शेती करून सर्व भोग भोगून पहिले होते. त्यांचे ज्ञान अनुभवाने समृद्ध झालेले होते. खरेतर शेतकरी आंदोलनचा इतिहास हा एका अर्थी शरद जोशींचा इतिहास आहे. त्यांचे निधन १२ डिसेंबर २०१५ रोजी झाले आणि एक वादळी पर्व संपले! पण त्यांनी आज स्वतंत्र भारताच्या इतिहासात आपला ठसा कायमचा उमटवला आहे, ह्यात शंकाच नाही!
- डॉ. देवव्रत शिरोळकर
shirolkar.devavrat@gmail.com
शरद जोशींच्या निधनानंतर झी २४ तास या वृत्तवाहिनीने त्यांच्या जीवनप्रवासावर तयार केलेली ही चित्रफित पहा
https://youtu.be/IzeKq9Eltro
शेतकरी संघटना न्यास आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांच्या संयुक्त साहचर्याने शरद जोशी आणि शेतकरी संघटनेशी संबंधित सर्व साहित्य - पुस्तके, फोटो, ध्वनी-चित्रफिती इ. विकिमिडिया प्रकल्पांमध्ये मुक्त रुपात सर्व समाजाला उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रकल्प हळूहळू आकाराला येत आहे. ३० जूनअखेर पुढील साहित्य मुक्त करून अपलोड केले गेले आहे. आपण हे साहित्य कोणत्याही प्रकारे वापरू शकता -
* शरद जोशी यांची १३ पुस्तके - https://w.wiki/Vgd
* भानू काळे यांचे १ पुस्तक - https://w.wiki/Vgc
* सुरेशचंद्र म्हात्रे संपादित १ पुस्तक - https://w.wiki/Vfw