top of page
  • Writer's pictureYuvonmesh JP

विजयी अरुण - अचल स्वामी

चित्रपटांसाठी साऊंड रेकॉर्डिंगचं काम करताना शूटिंगच्या निमित्तानं अनेकवेळा देशात परदेशात बरीच भटकंती होत असते. तरीही काही ठिकाणं राहून जातात. त्यातलंच एक ‘अरुणाचल प्रदेश’. नोव्हेंबर २०१९ मध्ये दिग्दर्शिका विनीता अनगळ यांचा फोन आला, ‘अरुणाचलमध्ये एक डॉक्युमेंट्री करायची आहे. साऊंडचं काम आहे.’ नेहमी जशा ध्वनिमुद्रणाच्या सुपार्‍या असतात तशीच ही सुद्धा होती. वाटलं, असून असून काय असणार, एखादं गाव, गरीबी, आदिवासी.. काही क्रिएटिव्हिटी नाही.. एखादी समस्या, प्रश्न आहे तसा रेकॉर्ड करायचा, असंच काहीसं वाटत होतं, फरक इतकाच की, स्थळ ‘अरुणाचल प्रदेश’.


१ डिसेंबर २०१९ ला टीमसोबत निघालो. पुण्याहून आसाममधल्या दिब्रूगडला आम्ही विमानाने पोहोचलो. दिब्रूगड ते रोइंग हा प्रवास रस्त्याने जीपमधून करायचा होता. साधारण पाच सहा तासांचा हा प्रवास अतिशय आल्हाददायक होता. स्वच्छ सूर्यप्रकाश, थंड हवा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला चहाचे मळे, डोंगररांगा बघूनच अरुणाचलच्या सौंदर्याची चाहूल लागत होती. रोइंगच्या जरा अलिकडेच आमची गाडी बंद पडली. अंधारून आलं होतं. थोड्याच वेळात दुसरी गाडी आम्हाला नेण्यासाठी आली. गाडीतून उतरून पंचावन्न - साठीचं एक व्यक्तिमत्व आमच्याकडे आलं आणि “नमस्कार, मी विजय स्वामी!” म्हणत आपली ओळख करून दिली. त्यांच्याबरोबरच आम्ही रोइंगमध्ये रिवॉच (RIWATCH) ला पोहोचलो. खूप छान स्वागत, आदरातिथ्य झालं. ‘आठ दहा दिवस राहायचं, ज्या कामासाठी आलोय तेव्हढं करायचं आणि निघायचं’, असा साधारण व्यावसायिक विचार होता. पण जसजसं शूटिंग होऊ लागलं तसं काहीतरी वेगळं असं जाणवू लागलं. हळू हळू रिवॉच आणि विजय स्वामींचा प्रवास उलगडू लागला.

कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातून ‘जीवनव्रती’ म्हणजे ‘संपूर्ण जीवन स्वामी विवेकानंदांच्या विचाराने जगणे’ स्वीकारल्यानंतर विजयजींची पोस्टिंग १९८६ साली अरुणाचल प्रदेशला झाली. दळणवळणाची साधनं, दैनंदिन सुख-सुविधा यांचा प्रचंड अभाव अशी परिस्थिती असतानाही विजयजींनी अरुणाचलमध्ये राहायचं ठरवलं. पण तिथं काम करणं सोप नव्हतं. तिथलं राहणीमान, खानपान विजयजींना अजिबात मानवणारं नव्हतं. मुळात तिथला मुख्य आहार म्हणजे विविध प्रकारचा मांसाहार व भात, आणि विजयजी पूर्णतः शाकाहारी. संघर्षाला इथूनच सुरुवात झाली. कित्येक वेळा उकडलेले बटाटे खाऊन किंवा कधी उपाशीपोटी फक्त पाणी पिऊन त्यांनी दिवस काढले. त्याचबरोबर तिथली भाषा वेगळी, वातावरण वेगळं. आदिवासींचे पाडे बर्‍यापैकी अंतरावर होते. ऊन वारा पाऊस ह्यांच्याशी सामना करत पायी त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागायचं.


सुरुवातीला विवेकानंद केंद्राच्या शाळांमध्ये विजयजींनी शिक्षक म्हणून साक्षरतेसाठी काम केलं. नंतर एका स्कॉलरशिपवर ते अमेरिकेला ICCS (International Centre for Cultural Studies) संस्थेत अभ्यासासाठी गेले. परतल्यावर त्यांनी RIWATCH (Research Institute of World Ancient Traditions Cultures and Heritage) ही संस्था २००९ मध्ये रोइंग येथे स्थापन केली. अरुणाचलमध्ये आदिवासींच्या २५ ते ३० मुख्य आणि ७० ते ८० उपजमाती आहेत. सुरूवातीला रोइंगमधल्या प्रमुख ‘इदूमिश्मी’ या आदिवासींसाठी त्यांनी काम करायचं ठरवलं. आदिवासींच्या विकासासाठी उभारलेल्या रिवॉचला स्थानिक लोकांनी भरभरून साथ दिली. कोणी जमीन दिली, कोणी बांधकाम करून दिलं. कोणी गाडी दिली, कोणी गॅस शेगडी, सोलार उपकरणं दिली.

रिवॉचमधल्या कामात, संशोधनात स्थानिकांना सामील केलं जातं. इथल्या हुशार, लायक लोकांना परदेशातल्या मोठमोठ्या संस्थेत पाठवून तिथल्या लोकांशी ताळमेळ घालून इथं त्याचा उपयोग कसा होईल याचा नियोजनबद्ध विचार असतो. अशा प्रकारे तिथले पंधरा विद्यार्थी जगभरातल्या विविध ठिकाणी जाऊन आलेत. स्थानिक प्रशासनातल्या लोकांनाही रिवॉचच्या संशोधनांत, कामांमध्ये बरोबर घेऊन, त्यांनाही बाहेरच्या देशात नेऊन ‘तिथले उपक्रम इथं कसे अंमलात आणता येतील’ या विचारांना चालना देण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून सरकारी स्तरावर राज्यात काही सुधारणा, पॉलिसी आणायच्या असतील तर त्याचा उपयोग होतो. शेतीची प्रगती, सेंद्रिय शेती प्रशिक्षण वगैरे विकासात्मक शिबिरं रिवॉचमध्ये आयोजित केली जातात. आदिवासी तरुण डॉक्टर, इंजीनियर, आय.ए.एस. ऑफिसर असे उच्चशिक्षित व्हावेत, त्यांची प्रगती व्हावी, ते देशाच्या मुख्य प्रवाहात यावेत यासाठी विजयजी झटत असतात. रिवॉच आपल्यासाठी काम करतंय हा विश्वास निर्माण झाल्याने लोकही कामात रस घेतात. रिवॉचमधले ९० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यकर्ते स्थानिकच आहेत.


अरुणाचलची ७५ टक्के सीमा चीन, तिबेट, भूतान, म्यानमार या देशांना आणि २५ टक्के आसामला चिकटून असूनही अरुणाचल आपलं अस्तित्व, वैशिष्ट्य आणि वारसा टिकवून आहे. तिथले लोक वनस्पती आणि प्राण्यांना आपले नातेवाईक मानतात. त्यांची प्राचीन संस्कृती, परंपरा, वारसा जपला जावा म्हणून विजयजींनी संग्रहालयाची कल्पना मांडली. ही कल्पना तिथल्या लोकांनीही उचलून धरली. आदिवासींनी पुरातन, पारंपारीक ठेवा, वारसा, चित्रं, दागिने, माळा, तलवारी, हत्यारं, इतर वस्तू असा लाखोंच्या किमतीचा खजिना विनामोबदला विजयजींच्या स्वाधीन केला. एक audio visual विभागही बनवला. त्यात तिथल्या प्राचीन संस्कृतीविषयी, परंपरांविषयी माहिती जतन केली जाते. हिमालयीन औषधी वनस्पतींचं ज्ञान सर्वांना व्हावं, ते टिकावं म्हणून विजयजींनी एक मोठ्ठं वनस्पती गार्डनही बनवलंय. इथं अँथ्रोपोलोजी, आर्किओलोजी इत्यादि अनेक कोर्सेस घेतले जातात. देशभरातून, जगभरातून लोक, विद्यार्थी इथं अभ्यासासाठी, संशोधनासाठी येतात. आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना एम.फील. आणि पी.एच.डी.साठी इथं मार्गदर्शन केलं जातं. विद्यार्थ्यांसाठी कॉटेजेस्, क्लासरूम्स, स्टुडिओजची सोयही रिवॉचमध्ये आहे.


‘जीवनव्रती’ असल्यानं रिवॉचचे डायरेक्टर असूनही विजयजींची स्वतःसाठीची अशी वेगळी खोली वगैरे नाहीये. ते कधी कधी ऑफिसमध्येही झोपतात. रिवॉचला एक रीसर्च इंस्टीट्यूट ते विद्यापीठ बनवण्याचं दायित्व विजयजींकडे आहे. संस्कृती आणि जीवनपद्धती यांची सांगड घालून २१ व्या शतकात आपल्याला कसं सुखकर जगता येईल यादृष्टीने विजयजींचं काम चालू आहे.

पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीचे माजी प्राचार्य स्वर्गीय श्री.विवेक पोंक्षे हे पूर्वी अरुणाचलमध्ये काम करत होते. त्यांना अरुणाचलच्या लोकांबद्दल प्रेम आणि आपुलकी होती. विजयजींचा त्यांच्याशी संपर्क होता. त्यांची जीवनपद्धती, विचारसरणी विजयजींना खूप आवडायची. सततच्या संपर्कामुळे पोंक्षेसरांकडे आणि ज्ञानप्रबोधिनीकडे ओढा आणि येणंजाणं वाढलं. रिवॉच सुरू करताना वैचारिक साथ, दिशा, संशोधन कसं करायचं, संस्था कशी उभी करायची हे ज्ञान विवेक पोंक्षेसर आणि प्रबोधिनीमुळे मिळालं असं विजयजी आवर्जून सांगतात.


रिवॉच आणि विजय स्वामींचं आभाळाएव्हढं काम छोट्याशा कॅमेर्‍यात थोडंफार कोंबून आम्ही निघालो. पण परतीचा प्रवास फार सुखकर नव्हता. देशात CAA, CAB आणि NRC चा मुद्दा नुकताच सुरू झाला होता. अरुणाचलचा तसा संबंध नसला तरी आसाममध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटली होती. आंदोलनाने हिंस्त्र वळण घेतलं होतं. आमचा विमानप्रवास अरुणाचलमधून व्हाया आसाम असा होता, पण आसामच्या दिब्रूगड विमानतळावर पोहोचणं अशक्य होतं. रस्तोरस्ती आंदोलनं चालू होती. विजयजींनी दिब्रूगडमधले त्यांचे एक सहकारी आणि शुभचिंतक श्री. संजय शर्माजी यांच्या सहाय्याने पुढचे ३ दिवस आमची सोय केली. तीन दिवसांनंतर कर्फ्यू जरा शिथिल झाला. तेव्हा कसंबसं मुंबईचं विमान मिळालं आणि आम्ही पुण्याला सुखरूप पोहोचलो. प्रवासात राहून राहून वाटत होतं की, आपणही समाजाचं काही देणं लागतो, निदान रिवॉचसारख्या संस्थांसाठी काहीतरी करायला हवं. माझ्या परीने रिवॉचच्या दृक-श्राव्य स्टुडिओसाठी सहकार्य करायचं मी ठरवलं आहे.


अजूनही अरुणाचलच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ मनावरून उतरलेली नाही. ती कालांतराने उतरेलही कदाचित, पण उच्चशिक्षणानंतर सुखासुखी जीवन सोडून समाजकार्याचा विडा उचललेले विजय स्वामी, त्यांची तळमळ, त्यांचं काम, त्यांचे सहकारी, तिथले गरीब पण दिलदार आदिवासी यांचा कमी वेळात आयुष्यावर कोरला गेलेला प्रभाव कधीही कमी होणार नाही.


‘अरुणाचल’ म्हणजे अरुण – अचल अर्थात ‘उगवत्या सूर्याचा पर्वत’. विजयजींचा ‘जीवनव्रती’ कार्याचा अचल निश्चय असाच सूर्यासारखा कार्यरत राहो.



- गणेश फुके

gana2419@gmail.com



विजयजींच्या आणि रिवॉचच्या कामावर आधारित चित्रफीत पाहण्यासाठी पुढील link वर click करा 

https://drive.google.com/file/d/10jiew6gvn-M2nJCfhcA3o9_QSJTV0_Ic/view?usp=sharing

254 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page