९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्यासंबंधीचा बहुप्रतीक्षित ऐतिहासिक निकाल दिला. गेल्या आठवड्यात ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत राममंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. लवकरच तिथे भव्य राममंदिर उभारलं जाईल आणि त्याबरोबरच गेली २९-३० वर्षंं त्या जागेला प्राप्त झालेलं स्वरूपही पूर्णपणे बदलून जाईल. ऑक्टोबर २०१८ मध्ये एका Conference च्या निमित्ताने एक आठवड्यासाठी लखनौला गेलो असताना तिथून जवळच असलेल्या अयोध्येला भेट दिली होती. त्या भेटीदरम्यान आलेले अनुभव आणि त्या अनुषंगाने झालेलं चिंतन या प्रवासवर्णानातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
अयोध्येला जाण्यासाठी म्हणून सकाळी लवकर उठून, आवरून निघालो. लखनौच्या आलमबाग बस स्टँडवर पहिला धक्का मिळाला. थक्क करून टाकणारं भव्य-दिव्य चकचकीत बस टर्मिनल. आत प्रवेश करताच प्रशस्त जागेत सुमारे १५-२० खिडक्या होत्या. लवकरची वेळ असल्याने गर्दी काहीच नव्हती. वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकांचे चार्ट्स आणि LED indicators लावले होते. प्रत्येक चौकशी खिडकीवर एक छोटा mike आणि speaker लावलेला होता. माझ्या गाडीचा फलाट क्रमांक माहीत करून घेऊन मी आत गेलो. तिथेही प्रत्येक फलाटावर क्रमांक, बसचे गंतव्य स्थान आणि वेळ दर्शवणारे indicators लावले होते. स्थानकावरील स्वच्छतागृह एखाद्या चांगल्या मॉलमधील स्वच्छतागृहाच्या तोडीचे होते. उपहारगृहात प्रत्येक पदार्थ पावती देऊनच विकला जात होता. माझ्या मागील एका माणसाला Lays wafers चे ठराविक flavor चे पाकीट हवे होते. पण त्या मालाची system मध्ये अजून नोंदणी व्हायची आहे, असे सांगून त्या कारणासाठी त्याला ते दिले गेले नाही. यंत्रणा चांगल्या बसवल्या आणि त्यांची अंमलबजावणी चोख होईल याकडे लक्ष दिलं तर आपोआपच accountability वाढते, भ्रष्टाचारास वाव उरत नाही, याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले.
बसच्या आतमधील सुविधाही उत्तम होत्या. प्रवास सुरू झाल्यावर आयोध्येविषयी माहिती शोधायला सुरूवात केली. Youtube वर काही documentaries, news reports बघितले. गरज पडेल तिथे google आणि wikipedia वर माहिती शोधत होतो. अयोध्येत जे काही झालं, त्याविषयी मनात कायमच संमिश्र भावना राहिलेल्या आहेत. जे झालं ते योग्यच झालं, पण ते योग्य पद्धतीने झालं नाही. बाबरी पाडल्याचे पडसाद किती वर्षं उमटत राहिले. हिंसाचाराच्या घटनांची एक शृंखलाच त्याला जोडली गेली आहे. बाबरी मशिद पाडतानाचे जे थोडके video footage उपलब्ध आहे, ते बघताना मनात सकारात्मक भावना तरी नक्कीच तयार होत नाहीत. केवळ उन्मादच त्यामध्ये दिसतो आणि दहशतीची भावना उमटते. पण एकीकडे असंही वाटतं की जर ते केलंच नसतं तर? आजही दिल्लीच्या कुतुबमिनाराप्रमाणे बाबरी दिमाखात उभी असती. कदाचित तीच एक प्रेक्षणीय स्थळ झाली असती. इतिहास न समजणारी बहुसंख्य जनता काहीही वावगे वाटून न घेता तिथे भेट देत राहिली असती. १९४९ साली २-३ जणांनी मध्यरात्री मशिदीच्या आवारात घुसून रामलल्लाची मूर्ती ठेवणे ही कृती अतिशय धूर्त आणि धाडसी होती. मग रामलल्ला अचानक प्रकट झाला, अशी आवई उठवून लोकांच्या भाबडेपणाचा, अंधश्रद्धाळूपणाचा फायदा घेतला गेला. पण पुन्हा प्रश्न पडतो की त्या काळी असा धूर्तपणा केला नसता, तर लोकांच्या मनात ही रामजन्मभूमी आहे, याची जाणीव तरी कधी निर्माण झाली असती का? हिंदूंचा दबाव गट कधी उभा राहिला असता का? पुढे दशकभरात त्या ऐतिहासिक जागेवर आपला हक्क सांगणारे ४ खटले भरले गेले आणि त्यापुढची आणखी दोन दशकं त्यांचं घोंगडं भिजत पडलं. सगळीच प्रकरणं न्यायप्रविष्ट असताना ९०-९२ साली जे आंदोलन पेटवलं गेलं, त्याला असलेली राजकीय झालर अमान्य करताच येणार नाही. इतकी काय जादू त्या नेत्यांमध्ये होती की लाखो लोकं चिथवली गेली. आपलं घरदार सोडून कानाकोपऱ्यातून अयोध्येला येऊन पोचली. मशिद पाडण्याच्या घटनेत काही कारसेवकांचाही बळी गेलाच ना. मशिदीच्या घुमटावर चढून हातोडे चालवणाऱ्यांना तो घुमट पडल्यावर आपणही त्या सोबत पडू, त्या ढिगाऱ्याखाली अडकू, याचेही भान राहीले नसेल? आपण काहीतरी मोठा पराक्रम गाजवतोय, याची इतकी धुंदी चढली असेल? आज त्या सगळ्या घटनांना पराक्रम मानून त्यांचा अभिमान बाळगावा असंही काही वाटत नाही किंवा त्यांना लाजिरवाणं ठरवून निषेध करावा असंही वाटत नाही. इतिहासातील काही घटना मूल्यमापन न करता नुसत्या स्विकारल्या पाहिजेत.
अयोध्येचा विचार करताना प्रत्येक वेळी न राहवून सोमनाथच्या मंदिराची आठवण होते. सरदार पटेलांनी ज्या पद्धतीने योग्य वेळी सोमनाथच्या जीर्णोद्धारासाठी पावलं उचलली, त्यासाठी त्यांच्या दूरदृष्टीला सलाम करावासा वाटतो.
गोरखपूरला जाणारी बस असल्यामुळे ती अयोध्या bypass करून जाणार होती. त्यामुळे bypass च्या अलिकडे उतरलो आणि maps वर रस्ता शोधत चालू लागलो. सकाळी १० - १०.३० ची वेळ होती. मंदिराचा परिसर ३ किमी. अंतरावर होता. रस्ते पूर्ण सामसूम होते, कुठलीच वर्दळ नव्हती. माणसांपेक्षा माकडंच जास्त दिसत होती. थोड्या वेळाने लक्षात आलं की आपण गावाच्या मागच्या बाजूने गावात प्रवेश करत आहोत. मंदिराकडे जाण्याचा हा मुख्य मार्ग नाही. त्यामुळे वाटेत कुठलीच दुकानं दिसत नव्हती. रस्ता अडवणारे, हार-प्रसाद घेण्यासाठी आग्रह धरणारे विक्रेते, मंदिरांचे दर्शन घडवून आणतो असं सांगून मागे लागणारे अयोध्येतले पंडित (guides) यापैकी कोणाचाच सामना करावा लागला नाही. अगदी शांत आणि निवांत अयोध्या दिसली. थोडं पुढे गेल्यावर एका पारावर गर्दी जमा झालेली दिसली. तिथे एक साधू राम मंदिर व्हावं, म्हणून १ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्यासोबत इतर १५-२० साधू त्यांच्या समर्थनासाठी बसले होते.
त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्याच वेळी वेगवेगळ्या news channels चे पत्रकार आलेले असल्यामुळे त्यांना बघण्यासाठी गावकऱ्यांनीही गर्दी केली होती. मीही थोडा वेळ त्या घोळक्याचा भाग झालो. समोर बरेच कॅमेरे आणि माईक आल्यामुळे जास्तीचा उत्साह दिसून येत होता. 'मोदी पंतप्रधान झाल्यापासून इतर अनेक ठिकाणी गेले, पण अजून अयोध्येत रामाच्या दर्शनाला आले नाहीत', याबद्दल साधूंनी नाराजी व्यक्त केली. आणि आता केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सुप्रीम कोर्टामुळे नव्हे, तर आमच्या उपोषणामुळेच राम मंदिर होणार असा निर्धार व्यक्त केला. मधूनच दुसऱ्या एका साधूने अमुक एका तारखेपर्यंत मंदिर न झाल्यास मी आत्मसमर्पण करीन, अशी घोषणा केली. त्यावर उपोषणाला बसलेल्या साधूने तुमच्या आधी मीच आत्मसमर्पण करीन, असं सांगितलं. मग २ मिनिटं 'कोण आधी आत्मसमर्पण करणार' हे जाहीर करण्याची चढाओढ सुरू झाली. शेवटी तिथल्याच एका तरुणाने 'जय श्रीराम' चा नारा दिला आणि मग सगळ्यांनीच त्यात सूर मिसळला. माध्यमांना त्यांच्या बाईट्सचा योग्य शेवट मिळाला. मग मागे उभे असलेल्या कॅमेरामन्सची दुसरी फळी पुढे झाली आणि पुन्हा चक्र सुरू झाले. थोडा वेळ ती गंमत बघून झाल्यावर मी घोळक्यातून बाहेर पडून पुढे चालू लागलो. मनात विचार आले, केवळ या भूमीत जन्माला आल्यामुळे, वाढल्यामुळे किंवा इथल्या आश्रमांमध्ये राहून शिकल्यामुळे, इथल्या वातावरणाचा प्रभाव पडून किती तरुणांनी साधू किंवा संन्यासी होण्याचा निर्णय घेतला असेल, त्यांचं रोजचं आयुष्य कसं असेल, मंदिर व्हावं या एका ध्येयासाठी उपोषणाला बासावंसं वाटावं, इतका तो त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग कसा झाला असेल. एखाद्या शहरात वाढलेल्या मुलाचं भावविश्व - विचारविश्व आणि आयोध्येसारख्या ठिकाणी वाढलेल्या मुलाचं भावविश्व - विचारविश्व यात त्या गावा-शहरातील वातावरणामुळे किती फरक पडतो !
जन्मभूमीचा परिसर जसा जवळ येऊ लागला तशी गजबज वाढू लागली. आजूबाजूला शेकड्यांनी मंदिरं दिसत होती. मागे लागणाऱ्या प्रत्येकाकडे दुर्लक्ष करून पुढे सरकावं लागत होतं. हनुमान गढीचं जुनं आणि प्रसिद्ध मंदिर आलं.
थोड्या पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश केला. इतर देवस्थानांमध्ये जसं वातावरण असतं तसंच होतं. थोडीफार गर्दीही होती. शिल्पकला, मूर्तिकला यातलं सौंदर्य वगैरे काही फार दिसलं नाही. सगळ्याच भिंतींवर वेगवेगळ्या देणगीदारांच्या नावांच्या याद्या, स्तोत्रं, आरत्या असं काही ना काही कोरून ठेवलं होतं. प्रदक्षिणा घालताना एका भिंतीवर रामरक्षा दिसली. अगदी लहानपणी ती पाठ होती. पुढे कधी म्हणण्याचा संबंधच आला नाही. गरज पडेल तिथे वाचत ती एकदा म्हटली. मंदिरात पेटी तबल्याच्या साथीसह रामधून गाण्याची सेवा सुरू होती. ती ऐकत थोडा वेळ थांबलो आणि बाहेर आलो. Maps चा आधार घेत जन्मभूमीच्या दिशेने चालू लागलो. सकाळपासून चालत असताना मनात इतर विचार चालू नसतील त्या वेळात रामनामाचा जप उत्स्फूर्तपणे सुरू झाला होता. वाटेत दशरथ दरबार, राम-भरत भेट अशी नावं असलेल्या वास्तू दिसत होत्या. त्यांच्या एकूण दिसण्यावरून पुण्यातल्या आजच्या लाल महालासारख्याच त्या वाटल्या. म्हणजे म्हणायला कोणे एके काळी त्या वास्तू कदाचित खरंच त्या जागी असतील. पण आत्ता तिथे जे आहे ते फारच आधुनिक बांधकाम. त्यामुळे तिथे आत न शिरता पुढे चालत राहिलो. दुपारची वेळ असल्यामुळे उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत होता. अंगाची लाही होत होती. १२ वाजत आले होते. मनात आलं याच कडकडीत उन्हात तो जन्माला आला. या विचारामुळे थकवाही कणभर कमी जाणवू लागला. योगायोगाने १२ वाजताच रामजन्मभूमीपाशी पोचलो. पुन्हा मंदिराच्या मागच्या बाजूला मी आलो होतो. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. हीच ती भूमी हे लक्षात यायलाही थोडा वेळ गेला. काळ्या-पिवळ्या रंगांचे मोठे उभे दांडे लावून त्यांचं एक कुंपण तयार केलं होतं. त्याच्या आतमध्ये थोडी जागा सोडून पुन्हा तसंच आणखी एक कुंपण. ती दोन्ही कुंपणं तारांच्या वेटोळ्यांनी जोडलेली. आतमध्ये ओसाड जमीन आणि मशिदीच्या ढाच्याचं पडकं बांधकाम दिसत होतं. थोड्या थोड्या अंतरावर watch towers उभारलेले दिसले. बाहेर रस्त्यावर सुद्धा थोड्या थोड्या अंतरावर पोलिस चौक्या उभारलेल्या होत्या. एखाद्या military camp मध्ये आल्यासारखं वाटलं.
त्या रस्त्यावरून एक फेरी मारून पुन्हा मागे आलो. शेवटच्या चौकीपाशी थांबून तिथल्या पोलिसांबरोबर थोडा वेळ गप्पा मारल्या. त्यांच्याकडूनच मंदिराला जायचा रस्ता समजून घेतला. दुपारी ११ ते २ या वेळात मंदिर बंद असतं, असं कळलं. मध्ये वेळ होता म्हणून घाटावर जाऊन आलो. शरयू नदीचं पात्र मोठं आणि स्वच्छ आहे. दुपारची वेळ असल्यामुळे तिथेही कोणीच नव्हतं. अगदी एखादा साधू अंघोळ करत होता. घाटावरूनच थोडा वेळ गावाच्या दिशेने चाललो. गीतरामायणातल्या 'शरयू तीरावरी अयोध्या मनूनिर्मित नगरी' या गाण्याच्या ओळी आठवल्या. गदिमांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून गीत लिहिलं आहे. त्यातील वर्णन समोर दिसणाऱ्या दृश्यांशी कुठेच जुळत नव्हतं. गावात शिरून बस स्टँडच्या दिशेने रस्ता विचारात जाऊ लागलो. गावातली माणसं वागण्या बोलण्यावरून प्रेमळ वाटली. वाटेत बोअरवेलपाशी थांबून चेहरा धुतला, पाणी प्यायलं. स्टँडवरून रिक्षेने पुन्हा मंदिराकडे गेलो. आत्ताचा रस्ता हा गावात जाण्याचा मुख्य रस्ता असल्याने सकाळच्या उलट चित्र दिसत होतं. खूप गजबजाट आणि दुकानं, हॉटेल्सची गर्दी होती. उन्हामुळे फारशी भूक लागली नव्हती. थोडी केळी खाऊन मंदिराच्या दिशेने गेलो. तोपर्यंत मंदिर सुरू होण्याची वेळ झाली होती. यापूर्वी तिथल्या मंदिराचे कुठलेच photos बघितले नव्हते. सुरक्षेच्या कारणामुळे आतमध्ये कोणालाच कॅमेरा, मोबाईल वगैरे न्यायला परवानगी नसल्यामुळे इंटरनेट वर सुद्धा कुठलेच photos उपलब्ध नव्हते. त्यामुळे अगदी मोठं, भव्य-दिव्य नसलं तरी जे मंदिर आहे, त्याचं स्वरूप कसं असेल याविषयी उत्सुकता होती. बाहेरच लॉकरमध्ये सॅक, मोबाईल, पाकीट असं जवळचं एकूण एक सगळं समान ठेवावं लागलं. आतमध्ये चारही बाजूंनी जाळीने बंद केलेला वळणावळणांचा अरुंद रस्ता होता. एकूण ४ वेळा थोड्या थोड्या अंतरावर तपासणी झाली. दोन्ही बाजूंनी हातात बंदुका घेतलेले CRPF चे जवान होतेच. जणू काही एका बंदिस्त आणि अरुंद पिंजऱ्यातून चालत आहोत असं वाटत होतं. थोडा वेळ चालून गेल्यावर मध्ये एके ठिकाणी दोन मिनिटं सगळे थांबत होते आणि मग पुढे जात होते. मी तिथे गेल्यावर मलाही तिथल्या जवानाने थांबवलं आणि शेजारी उजवीकडे बघण्यास सांगितलं. दहा-बारा फूट अंतरावर एक कापडी तंबू उभारलेला होता. तंबूच्या प्रवेशद्वारापाशी दोन्ही बाजूंना बंदुकधारी सुरक्षा-रक्षक होते. पिंजऱ्यातून बाहेर पडून तंबूच्या जवळ जायची सोय नव्हती. तंबूचं कापडी दार अर्धवट उघडलेलं होतं. आतमध्ये एका चौथऱ्यावर कापडात गुंडाळलेली एक छोटीशी मूर्ती ठेवलेली होती. ती नीट दिसतही नव्हती. हेच सध्याचं राम मंदिर. जेमतेम मिनिटभर तिथे थांबलो आणि लांबूनच नमस्कार करून बाहेर पडलो.
- सुमेध फाटक
sumedh.phatak@jnanaprabodhini.org
१५ ऑक्टोबर २०१८
Comments