top of page
मुखपृष्ठ: Welcome
pixlr%20reduced_edited.jpg
logo-yu_edited.png

युवोन्मेष

ज्ञान प्रबोधिनीचे 'नेतृत्व' विषयाला वाहिलेले युवागटासाठीचे प्रायोगिक मासिक !!

मुखपृष्ठ: Blog2

सध्या कोरोना व्हायरसच्या संकटाशी भारतासह जगातील बहुतांश देश लढत आहेत. अमेरिका आणि युरोपातील विकसित देश सुद्धा या लढाईत चाचपडत असताना या आव्हानाला भारताने दिलेला प्रतिसाद जगाला अचंबित करणारा आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांच्या बरोबरच अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती आपल्या प्रशासकीय यंत्रणेने. भारतासारख्या भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं काम सुरळीत चालण्यासाठीची प्रशासकीय यंत्रणा ही सुद्धा तितकीच अजस्त्र आहे. सामान्य काळात विविध पातळ्यांवर ही यंत्रणा सक्षमपणे काम करतच असते, पण कुठल्याही प्रकारची नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आली तर तिच्या निवारणाचं काम करण्याची जबाबदारी या यंत्रणेवरच येते. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने पूर्ण देशात टाळेबंदी जाहीर केली. या टाळेबंदीची अंमलबजावणी करणं, टाळेबंदीच्या कालावधीत सर्व नागरिकांच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठीची यंत्रणा राबवणं, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा पुरवता याव्यात यासाठीची पूर्वतयारी (Covid Preparedness) करणं आणि या कालावधीत सामान्य नागरिक, विद्यार्थी, पर्यटक, मजूर इत्यादींचे होणारे स्थलांतर नियंत्रित करणं अश्या चार टप्प्यांवर प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि तालुका या पाच पातळ्यांवरून चालू असलेलं हे काम आता आपण थोडक्यात समजून घेऊया.


जगातील इतर देशांमध्ये आपल्या देशाच्या Embassies असतात. तिथे आपल्या देशाच्या वतीने भारताचे राजदूत आणि Foreign Services मधील अधिकारी काम करत असतात. सद्यपरिस्थितीत अन्य देशांमध्ये आपले जे नागरिक अडकले आहेत, ते तिथल्या embassies मध्ये जाऊन त्यांची लवकरात लवकर भारतात परतण्याची सोय व्हावी, अशी विनंती करत आहेत. देशाच्या सीमा सुरू होईपर्यंत त्या त्या देशांमध्ये त्यांच्या प्राथमिक गरजा भागतील याकडे लक्ष देणं, भारतातील टाळेबंदी जसजशी शिथिल होईल, तसं त्या नागरिकांना सुखरूपपणे मायदेशी पोचवण्यासाठीची यंत्रणा राबवणं अशी कामं हे अधिकारी तत्परतेने करत आहेत. देशपातळीवर विविध क्षेत्रांनुसार आणि कामांच्या प्रकारांनुसार अधिकाऱ्यांचे सरकारतर्फे एकूण ११ गट करण्यात आले आहेत. Lockdown ची अंमलबजावणी करणं, विविध केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधणं, जीवनावश्यक वस्तूंची देवाण-घेवाण सुरळीत होईल याची खबरदारी घेणं, इतर देशांकडून मागवलेली Testing Kits, औषधं, PPE Kits आवश्यकतेनुसार आरोग्य यंत्रणांपर्यंत पोचवणं, एका राज्यातून दुसऱ्या राज्यांत जाणाऱ्या स्थलांतरितांची काळजी घेणं, ठिकठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी होईल, भोजन-निवासाची सोय होईल याकडे लक्ष देणं अशी विविध प्रकारची कामं हे गट करत आहेत.


राज्य पातळीवर Covid-19 साठी स्वतंत्र War Rooms तयार करण्यात आल्या आहेत. IAS अधिकारी मृण्मयी जोशी यांच्याकडे सध्या केरळ राज्याच्या War Room ची जबाबदारी आहे. संपूर्ण राज्यात जिथे जिथे गरज आहे त्याप्रमाणे Supply Chain Logistics सांभाळण्यासाठी त्यांनी वेगळं खातं तयार केलं आहे. या खात्याद्वारे ज्या वस्तूंचं उत्पादन केरळ मध्ये होत नाही आणि त्यामुळे त्या इतर राज्यांमधून मागवाव्या लागतात अशा वस्तूंचा पुरवठा आणि मालवाहतूक नियंत्रित करण्याचं आणि त्याद्वारे राज्याच्या मागणी आणि पुरवठ्यात समतोल राखण्याचं काम केलं जात आहे. त्याचबरोबर आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यांमधील हजारो कामगार केरळमध्ये अडकले आहेत. Lockdown सुरू झाल्यावर तातडीने आपापल्या राज्यात परत जाण्याची त्यांची मागणी राज्यांच्या सीमा बंद असल्यामुळे पूर्ण करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र Camps उभारण्यात आले. District Labour Officers आणि Health officers शी समन्वय साधून त्यांनी काही काळ तिथेच थांबणं का आवश्यक आहे, हे त्यांना समजावून सांगण्यात आलं. या सगळ्या प्रक्रियेत भाषेची मोठी अडचण जाणवत होती. कारण केरळमध्ये हिंदी भाषा समजणारे व बोलता येणारे अधिकारी कमी आहेत आणि परराज्यातील कामगारांना मल्याळी किंवा इंग्रजी भाषा समजत नाही. अशा वेळी त्यांना ज्या महत्त्वाच्या सूचना देणं गरजेचं होतं त्या सूचनांची मृण्मयीने त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये Posters तयार करून घेतली आणि ते रहात असलेल्या camps मध्ये ती लावली. यामुळे सर्व स्थलांतरित मजुरांचा यंत्रणेवरील विश्वास अपोआपच वाढला आणि परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ते त्यांच्यासाठी उभारलेल्या Camps मध्ये राहण्यास तयार झाले.


डॉ. धनंजय घनवट, IPS अधिकारी आत्ता आसाममधल्या धेमाजी जिल्ह्यात SP म्हणून काम करत आहेत. त्यांनी तिथे एक अतिशय सुंदर कल्पना अंमलात आणली आहे. आत्ता त्या ठिकाणी १००० लोक विलगीकरण कक्षात आहेत. यापैकी काही सरकारी दवाखान्यांमध्ये आहेत तर काही आपापल्या घरीच आहेत. कोरोनामुळे सध्याच्या काळात अनेक मानसिक प्रश्न सुद्धा निर्माण झाले आहेत. लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. त्यांना एकटं वाटतंय. यावर उपाय म्हणून डॉ. धनंजय यांनी समाजामधल्या प्राध्यापक, डॉक्टर, तसंच विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि एकेकाला २ Quarantined रुग्णांशी जोडून दिलं. या कार्यकर्त्यांनी रोज दोन्ही रुग्णांना audio किंवा video call करायचा आणि त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांना धीर द्यायचा. त्यांच्या अडचणी, गरजा समजून घ्यायच्या. त्यावर काही उपाययोजना आवश्यक असेल, उदाहरणार्थ दूध, किराणा सामान अशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू हव्या असतील तर त्या त्यांच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करायची आणि त्याबरोबरीने त्यांना Covid-19 आजाराबद्दलची योग्य माहिती द्यायची, त्यांनी काय प्राथमिक काळजी घेतली पाहिजे ते सांगायचं. Telemedicine पद्धतीने डॉक्टरांशी जोडून द्यायचं आणि जर आवश्यकता असेल तर काही औषधं सुद्धा त्यांच्या घरी पोचवायची. या योजनेमुळे Quarantined patients चं एक प्रकारे समुपदेशनच केलं जातंय. त्यांचा एकटेपणा कमी होतोय. यावर संशोधन करण्याची गरज ओळखून तेही काम आता तिथल्या पोलिसांनी काही मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने हाती घेतलंय. समाजाला हाताशी धरून, जणू काही हे आपल्यावर एकत्रितपणे ओढवलेलं संकट आहे अशी भावना निर्माण करून डॉ. धनंजय हे काम करत आहेत. रुग्णांशी संपर्कात राहण्याचं काम सर्व कार्यकर्ते स्वयंसेवी वृत्तीने करत असल्याने त्याचा कुठलाही आर्थिक ताण प्रशासकीय यंत्रणेवर आलेला नाही. यातून पुढे असंही झालं की Quarantine संपून सुखरूप बाहेर आलेल्यांपैकी अनेकांनी पुढच्या रुग्णांसाठी कार्यकर्ते म्हणून स्वतःहून काम केलं. एका छोट्या योजनेतून लोकांच्या मनातून एकटेपणा दूर होऊन त्या जागी सकारात्मक अशी समूहभावना कशी निर्माण होऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे.


अंजली मरोड या सध्या अक्कलकोटला तहसीलदार म्हणून काम करत आहेत. तिथे स्थलांतरित मजुरांसाठी एक मोठं शिबिर उभारण्यात आलंय. त्यामध्ये अनेकांच्या भोजन व निवासाची व्यवस्था केली आहे. आपल्या कुटुंबियांपासून लांब अडकून पडल्यामुळे त्यांचेही अनेक मानसिक प्रश्न आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी अंजली यांनी एका योग प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे. तिथे सध्या दररोज योगासने, प्राणायाम आणि इतर काही विषयांवर गप्पा, मार्गदर्शन यांचं आयोजन केलं जातंय. अशाच पद्धतीने श्रीगोंदे येथे सुधाकर भोसले या अधिकाऱ्याने Art of Living च्या काही शिक्षकांच्या मदतीने तिथल्या Camp मधील मजुरांसाठी रोज प्रवचन, खेळ, योगासनं घेण्याची योजना केली आहे. प्रशांत वडनेरे हे कन्याकुमारी येथे कलेक्टर आहेत. कोरोनाच्या या संकटाला जर आपण युद्ध मानलं तर या युद्धात प्राणपणाने लढणारे सैनिक म्हणजेच सध्याचे आरोग्य सेवेत काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका आणि त्यांचे साहाय्यक व सेवक. त्यांचा धीर टिकून राहावा आणि त्यांचं आरोग्य सुरक्षित राहावं याचीही जबाबदारी समाजाने घेणं आवश्यक आहे. प्रशांत स्वतः आपल्या कुटुंबियांसमवेत न राहता Guest House वर राहून काम करत आहेत. मात्र रोजचं काम संपल्यावर ते आवर्जून सर्व हॉस्पिटल्समध्ये जाऊन तिथल्या आरोग्य सेवकांना भेटतात, त्यांची विचारपूस करतात, त्यांच्याशी विविध विषयांवर अनौपचारिक गप्पा मारतात आणि याद्वारे त्यांचा धीर टिकावा, मनोबल वाढावं यासाठी प्रयत्न करतात. एक अधिकारी आपल्याशी केवळ कामापुरता संबंध न ठेवता आपल्यापैकीच एक असल्याप्रमाणे आपल्यात मिसळत आहेत हे पाहून सर्व आरोग्य सेवकांना खूप छान वाटतं. सातारा जिल्ह्यातील तहसीलदार आशा होळकर यांनी सांगितलेलं कामाचं उदाहरण मनाला स्पर्श करून जाणारं आहे. कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू होतो त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सरसकट देता येत नाहीत, कारण त्यातूनही संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे तिथल्या आरोग्य विभागाचे कर्मचारीच खांद्यावरून लाकडं वाहून चिता रचणं आणि मृत व्यक्तीचा अंत्यविधी करण्याचं काम करत आहेत.


या सर्वच उदाहरणांवरून आपल्याला असं लक्षात येईल की माणसाच्या केवळ शारीरिक गरजांनाच नाही, तर मानसिक, बौद्धिक आणि भावनिक गरजांनाही प्रतिसाद देण्याचं काम हे अधिकारी करत आहेत. केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर बंधुत्वाच्या भावनेतून आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत अविरतपणे काम करत हे अधिकारी प्रशासकीय ‘सेवा’ हे नाव सार्थ करत आहेत. विशेष आनंदाची बाब म्हणजे हे अधिकारी ज्ञान प्रबोधिनीच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे माजी विद्यार्थी आहेत. प्रशासकीय यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर सद्प्रवृत्तीचे आणि उत्तम काम करणारे अधिकारी जावेत, या अधिकाऱ्यांचं चांगलं Networking व्हावं, त्यांनी कामात एकमेकांना मदत करावी आणि केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर संपूर्ण जगभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा या उद्देशाने स्पर्धा परीक्षा केंद्राचं काम चालू आहे. भारतातील सर्व राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध पदांवर स्पर्धा परीक्षा केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले अधिकारी कार्यरत आहेत. त्याचबरोबर जगातल्या १७ देशांमध्ये अनेक अधिकारी IFS Officers म्हणून काम करत आहेत. लेखात उल्लेख केलेले आणि त्याशिवायही इतर सर्वच अधिकारी अक्षरशः पूर्ण वेळ अहोरात्र काम करत आहेत, शासन यंत्रणेचा कणा सांभाळत आहेत, म्हणूनच आपण सामान्य नागरिक आपापल्या घरात सुरक्षित आहोत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


- प्रा. सविता कुलकर्णी



शब्दमर्यादेमुळे काही निवडक उदाहरणेच या लेखात समाविष्ट केली आहेत. या विषयावर Facebook वरील ज्ञान प्रबोधिनीच्या Distance Learning Page द्वारे प्रसारित झालेले मा. सविताताईंचे पूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी पुढील Link वर click करा. 

https://m.facebook.com/story.phpstory_fbid=3234037956626519&id=105130737789855&sfnsn=wiwspmo&extid=nm9idytgFN1XH3AJ&d=n&vh=e
 

111 views2 comments
Writer's pictureYuvonmesh JP

प्रिय युवा मित्र-मैत्रिणींनो,


नमस्कार! कसे आहात सगळे? तुम्ही आणि तुमच्या घरचे, जवळपासचे सर्वजण सुखरूप असाल, अशी आशा आणि प्रार्थना करतो. करोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे मागील दोन-अडीच महिने आपण सर्वजण स्थानबद्धतेत आहोत. या सर्व परिस्थितीमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर (Physical Distancing) राखण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय ते जागतिक पातळीवर आपल्याला जे काही प्रयत्न करावे लागत आहेत, त्यावरून आपण सर्वजण एकमेकांशी किती पद्धतीने आणि किती प्रकारे जोडलेले आहोत हे लक्षात येते आहे. एरवी स्वत:च्या विश्वात हरवून गेलेल्या आपल्या सर्वांना हे विसरायला होते.


एखाद्या व्यवस्थेवर जेव्हा ताण पडतो, तेव्हा त्या व्यवस्थेतील कमकुवत स्थाने (Weakness) उघडी पडतात, त्याचप्रमाणे बलस्थाने देखील लक्षात येतात. सद्यस्थितीत हे आपल्याला अगदी स्वत:पासून, आपले कुटुंब, मित्रपरिवार, संस्था-संघटना, समाज, राष्ट्र, जग अशा सर्व पातळींवर पाहायला मिळेल. ही एक संधी आहे आपली कमकुवत स्थाने लक्षात घेऊन त्यांवर काम करण्याची...आता नेहमीसारखे आपल्याला त्या कमकुवत स्थानांकडे दुर्लक्ष करून, त्यांना टाळून चालणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ अगदी आपल्या कुटुंबाच्या पातळीवर देखील सर्वांनी ठरवून काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे, काही गोष्टी ठरवून त्याप्रमाणे सर्वांनी आचरण करावे लागणार आहे; पण आपल्यामध्ये सुसंवाद नसेल तर हे शक्य होणार नाही आणि त्याची किंमत सर्व कुटुंबाला चुकवावी लागेल. म्हणजेच कौटुंबिक पातळीवर काही विसंवाद असेल तर त्यावर काम करून त्याला सुसंवादाकडे न्यावे लागेल.


सामाजिक पातळीवर देखील आपल्याला लक्षात येतंय की असंघटित, रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. एरवी ते कसे जगतात, काय परिस्थितीत राहतात/काम करतात, काय हालअपेष्टा सोसतात याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. करोनामुळे कराव्या लागलेल्या स्थानबद्धतेमध्ये समाजाच्या या कमकुवत असलेल्या दुव्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. काम नाही त्यामुळे रोजच्या मिळकतीवर अवलंबून असलेल्या पोटाला खायचे काय? राहायचे कुठे? असे जगण्याशी, अस्तित्वाशी निगडित भीषण प्रश्न असलेला हा असहाय गट मग सरळ रस्त्यावर येऊन आपल्या गावाकडे चालत जायला निघाला. आणि मग शारीरिक अंतर, स्थानबद्धता या सर्व समाजाच्या स्वास्थ्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योजलेल्या उपायांच्या परिणामकारकतेवर मोठ्या प्रमाणावर मर्यादा आल्या. हा गट जर संघटित असता, यांची सरकार दफ्तरी नोंद असती, बँकेत खाती असती तर यांच्या खात्यात तातडीने मदत जमा करून त्यांना तातडीने सुरक्षितता देता आली असती. असे सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, राजकीय क्षेत्रांतले, रचनांमधले वेगेवेगळ्या पातळीवरचे कच्चे दुवे या निमित्ताने आपल्या लक्षात आले असतील. त्यांची नोंद घेऊन, भविष्यात त्यावर काम करण्यासाठी कंबर कसली पाहिजे, असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं?


अर्थात या काळात आपली काही बलस्थाने (strengths) (उदा. कुटुंब व्यवस्था, सामाजिक/सांस्कृतिक संघटना/संस्था) सुद्धा जाणवली असतील, ती अधिक जोपासली पाहिजेत. पुढील काळ आपल्या सर्वांसाठी आव्हाने घेऊन येणार आहे, त्यांच्याकडे संधी म्हणून कसं बघता येईल, याचा विचार आपण करायला हवा. असं म्हणतात की, “Never waste a good crisis!” या सगळ्या काळात तुम्हाला देखील काही गोष्टी विशेषत्वाने जाणवल्या असतील, अनुभवायला मिळाल्या असतील, स्वत:बद्दल, इतरांबद्दल, जगाबद्दल...काही खटकल्या असतील, काही आवडल्या असतील. त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्या लिहून जरूर कळवा.


सर्व जग एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. आपण देखील या निमित्ताने ‘युवोन्मेष’च्या प्रक्रियेत काही बदल करत आहोत. आत्तापासून युवोन्मेष आपल्याला ब्लॉगच्या स्वरूपात उपलब्ध होईल. दर आठवड्याला ‘युवोन्मेष’चा भाग म्हणून किमान एक लेख तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला तो मोबाईलवर वाचता येईल आणि मुख्य म्हणजे तुम्हाला लेखावर तुमचे प्रतिसाद नोंदवता येतील, इतरांचे प्रतिसाद वाचता येतील. थोडक्यात म्हणजे ‘युवोन्मेष’ तुम्हाला अधिक सहजपणे उपलब्ध (easily accessible) होणार आहे, अधिक वारंवारीतेने (More frequent) भेटायला येणार आहे आणि तो अधिक संवादी (interactive) असणार आहे. या आव्हानात्मक काळात ‘युवोन्मेष’चे हे नवीन स्वरूप आपल्या सर्वांना अधिक जोडलेले, संघटित ठेवायला आणि शारीरिक अंतर (Physical distance) राखून देखील सामाजिक अंतर (Social distance) कमी करायला नक्की मदत करेल, अशी आशा वाटते. तुमच्या प्रतिसादाची आणि अभिप्रायाची वाट बघतो आहे. या नव्या संक्रमणासाठी (transformation) मनापासून शुभेच्छा!


तुमचा मित्र,

अमोल फाळके

86 views0 comments
मुखपृष्ठ: Subscribe

​​संपर्क

नेतृत्व संवर्धन केंद्र

ज्ञान प्रबोधिनी

५१०, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३०

०२०-२४२०७१७९

Picture1.png

समाज परिवर्तनासाठी

​नेतृत्व विकसन

मुखपृष्ठ: Contact
bottom of page