top of page
Writer's pictureYuvonmesh JP

संवाद

प्रिय युवा मित्र-मैत्रिणींनो,


नमस्कार! कसे आहात सगळे? तुम्ही आणि तुमच्या घरचे, जवळपासचे सर्वजण सुखरूप असाल, अशी आशा आणि प्रार्थना करतो. करोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे मागील दोन-अडीच महिने आपण सर्वजण स्थानबद्धतेत आहोत. या सर्व परिस्थितीमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर (Physical Distancing) राखण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय ते जागतिक पातळीवर आपल्याला जे काही प्रयत्न करावे लागत आहेत, त्यावरून आपण सर्वजण एकमेकांशी किती पद्धतीने आणि किती प्रकारे जोडलेले आहोत हे लक्षात येते आहे. एरवी स्वत:च्या विश्वात हरवून गेलेल्या आपल्या सर्वांना हे विसरायला होते.


एखाद्या व्यवस्थेवर जेव्हा ताण पडतो, तेव्हा त्या व्यवस्थेतील कमकुवत स्थाने (Weakness) उघडी पडतात, त्याचप्रमाणे बलस्थाने देखील लक्षात येतात. सद्यस्थितीत हे आपल्याला अगदी स्वत:पासून, आपले कुटुंब, मित्रपरिवार, संस्था-संघटना, समाज, राष्ट्र, जग अशा सर्व पातळींवर पाहायला मिळेल. ही एक संधी आहे आपली कमकुवत स्थाने लक्षात घेऊन त्यांवर काम करण्याची...आता नेहमीसारखे आपल्याला त्या कमकुवत स्थानांकडे दुर्लक्ष करून, त्यांना टाळून चालणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ अगदी आपल्या कुटुंबाच्या पातळीवर देखील सर्वांनी ठरवून काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे, काही गोष्टी ठरवून त्याप्रमाणे सर्वांनी आचरण करावे लागणार आहे; पण आपल्यामध्ये सुसंवाद नसेल तर हे शक्य होणार नाही आणि त्याची किंमत सर्व कुटुंबाला चुकवावी लागेल. म्हणजेच कौटुंबिक पातळीवर काही विसंवाद असेल तर त्यावर काम करून त्याला सुसंवादाकडे न्यावे लागेल.


सामाजिक पातळीवर देखील आपल्याला लक्षात येतंय की असंघटित, रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. एरवी ते कसे जगतात, काय परिस्थितीत राहतात/काम करतात, काय हालअपेष्टा सोसतात याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. करोनामुळे कराव्या लागलेल्या स्थानबद्धतेमध्ये समाजाच्या या कमकुवत असलेल्या दुव्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. काम नाही त्यामुळे रोजच्या मिळकतीवर अवलंबून असलेल्या पोटाला खायचे काय? राहायचे कुठे? असे जगण्याशी, अस्तित्वाशी निगडित भीषण प्रश्न असलेला हा असहाय गट मग सरळ रस्त्यावर येऊन आपल्या गावाकडे चालत जायला निघाला. आणि मग शारीरिक अंतर, स्थानबद्धता या सर्व समाजाच्या स्वास्थ्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योजलेल्या उपायांच्या परिणामकारकतेवर मोठ्या प्रमाणावर मर्यादा आल्या. हा गट जर संघटित असता, यांची सरकार दफ्तरी नोंद असती, बँकेत खाती असती तर यांच्या खात्यात तातडीने मदत जमा करून त्यांना तातडीने सुरक्षितता देता आली असती. असे सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, राजकीय क्षेत्रांतले, रचनांमधले वेगेवेगळ्या पातळीवरचे कच्चे दुवे या निमित्ताने आपल्या लक्षात आले असतील. त्यांची नोंद घेऊन, भविष्यात त्यावर काम करण्यासाठी कंबर कसली पाहिजे, असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं?


अर्थात या काळात आपली काही बलस्थाने (strengths) (उदा. कुटुंब व्यवस्था, सामाजिक/सांस्कृतिक संघटना/संस्था) सुद्धा जाणवली असतील, ती अधिक जोपासली पाहिजेत. पुढील काळ आपल्या सर्वांसाठी आव्हाने घेऊन येणार आहे, त्यांच्याकडे संधी म्हणून कसं बघता येईल, याचा विचार आपण करायला हवा. असं म्हणतात की, “Never waste a good crisis!” या सगळ्या काळात तुम्हाला देखील काही गोष्टी विशेषत्वाने जाणवल्या असतील, अनुभवायला मिळाल्या असतील, स्वत:बद्दल, इतरांबद्दल, जगाबद्दल...काही खटकल्या असतील, काही आवडल्या असतील. त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्या लिहून जरूर कळवा.


सर्व जग एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. आपण देखील या निमित्ताने ‘युवोन्मेष’च्या प्रक्रियेत काही बदल करत आहोत. आत्तापासून युवोन्मेष आपल्याला ब्लॉगच्या स्वरूपात उपलब्ध होईल. दर आठवड्याला ‘युवोन्मेष’चा भाग म्हणून किमान एक लेख तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला तो मोबाईलवर वाचता येईल आणि मुख्य म्हणजे तुम्हाला लेखावर तुमचे प्रतिसाद नोंदवता येतील, इतरांचे प्रतिसाद वाचता येतील. थोडक्यात म्हणजे ‘युवोन्मेष’ तुम्हाला अधिक सहजपणे उपलब्ध (easily accessible) होणार आहे, अधिक वारंवारीतेने (More frequent) भेटायला येणार आहे आणि तो अधिक संवादी (interactive) असणार आहे. या आव्हानात्मक काळात ‘युवोन्मेष’चे हे नवीन स्वरूप आपल्या सर्वांना अधिक जोडलेले, संघटित ठेवायला आणि शारीरिक अंतर (Physical distance) राखून देखील सामाजिक अंतर (Social distance) कमी करायला नक्की मदत करेल, अशी आशा वाटते. तुमच्या प्रतिसादाची आणि अभिप्रायाची वाट बघतो आहे. या नव्या संक्रमणासाठी (transformation) मनापासून शुभेच्छा!


तुमचा मित्र,

अमोल फाळके

86 views0 comments

Commentaires


bottom of page